मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे प्रतिपादन : आमठाणे येथे पंपिंग स्टेशनचा शुभारंभ
डिचोली
प्रतिनिधी
पाणी हा सर्वांचा जिव्हाळ्याचा विषय असून पाण्याची समस्या येणाऱ्या काळात राहू नये यासाठी सरकार गांभीर्याने नियोजन व काम करत आहे. गोव्याला पाणीप्रश्नी स्वयंपूर्ण बनविण्याच्या दृष्टीने सरकार विविध योजना व उपक्रम राबवत आहे. ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ या उपक्रमांकडे लोकांनी जास्त लक्ष द्यावे. अशा प्रकल्पांसाठी लोकांना जलस्रोत खात्याचे अभियंते सहकार्य व मार्गदर्शन करायला तयार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आमठाणे येथे केले.
बोअरवेलची नोंदणी करावी
‘पाणी अडवा पाणी जिरवा’ उपक्रमासाठी जर कोणी बोअरवेल मारली असल्यास तिची सरकार दरबारी रितसर नोंदणी करून घ्यावी, अन्यथा सरकारकडून भरमसाट दंड ठोठावला जाणार, असा इशारा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिला आहे.
आमठाणे धरणाच्या किनारी जलस्रोत खात्यातर्फे साकारण्यात आलेल्या भव्य पंपिंग स्टेशन आणि आमठाणे येथील पाणी जलवाहिनीद्वारे कुचेली येथे नेण्याच्या प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, मच्छीमारमंत्री नीळकंठ हळर्णकर, डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो, जिल्हा पंचायत सदस्य पद्माकर मळीक, मेणकुरेच्या सरपंच कुमुदिनी नाईक, लाटंबार्सेचे सरपंच रामा गावकर, जलसंपदा खात्याचे मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर आदींची उपस्थिती होती.
डिचोली मतदारसंघातील ग्रामीण भागात शुद्ध पाणी पुरविण्यासाठी साकारण्यात येणारा 10 एलएलडी जलशुद्धीकरण प्रकल्प येत्या निवडणुकीपूर्वीच होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले. डिचोलीचे आमदार आपले काम उत्कृष्टपणे बजावत आहे. लोकांना अपेक्षित असलेला विकास साधत असताना त्यांचा प्रभावी पाठपुरावा असतो. अपक्ष आमदार असूनही त्यांना राज्य सरकारने सर्व ते सहकार्य केले आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
साळ येथे 360 कोटींचा प्रकल्प : शिरोडकर
साळ गावात 360 कोटींचा प्रकल्प होत आहे. त्यामुळे लोकांना पाणी पुरविण्याची योजना अधिक सुलभ होईल. लोकांना 24 तास पाणी देण्याचा आमचा संकल्प आहे. पूर्ण समाजाला दर्जेदार पाणी हवेय ते देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नरत आहे. असे यावेळी जलस्रोतमंत्री सुभाष शिरोडकर यांनी म्हटले.
पाणीपुरवठा वाढवण्याचे प्रयत्न : खंवटे
पाणी नसल्यास लोकांना त्रास होतो. परंतु या सरकारने सर्वप्रथम सर्व भागांमध्ये पाण्याची योग्य व्यवस्था व्हावी यासाठी कच्चे पाणी सर्वत्र पोहोचविण्यासाठी अभिनव योजना हाती घेतली आहे. गरजेप्रमाणे पाण्याची सोय वाढवावी ही सरकारची जबाबदारी असून त्यासाठी सरकार व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गांभीर्याने लक्ष घालून पाण्याचा साठा गोव्यातच तयार करण्यासाठी उपक्रम राबविले, असे यावेळी मंत्री रोहन खंवटे यांनी सांगितले.
प्रत्येक घराला पाणीपुरवठ्याचा संकल्प : हळर्णकर
प्रत्येक घराला पाणी देण्याचा संकल्प सरकारने केला आहे. या प्रकल्पाचा लाभ बार्देश तालुक्यालाही होणार असून पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी मदत होणार आहे. घरोघरी पाणी पोहोचविण्याचे ध्येय पूर्ण करण्याच्या दृष्टीने गोवा सरकारने उचललेले मोठे पाऊल आहे, असे यावेळी मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी म्हटले.
आमठाणे करणार मोठा पाणीपुरवठा : डॉ. शेटये
आमठाणे येथील या पंपहाऊसमधून 150 एमएलडी पाणी पर्वरी, अस्नोडा, पिळर्ण, आसगाव येथे कच्चे पाणी पुरवले जाणार आहे. आमठाणे धरण मोठ्या प्रमाणात लोकांना पाणी देणार असल्याने हा आपणास अभिमान आहे. हे 55 कोटींचे काम असून पुढील 30 वर्षांचा विचार करून हाती घेतले आहे. डिचोली मतदारसंघातील ग्रामीण भागांसाठी 10 एलएलडी पाणी प्रकल्पाचे काम सुरू असून ते 70 टक्के पूर्ण झाले आहे. त्यावर 60 कोटी खर्च करण्यात येत असून येत्या निवडणुकीपूर्वी हे काम होणार आहे. याच धरणाचे पाणी आम्हाला मिळणार. याचे समाधान आहे, असे यावेळी डिचोलीचे आमदार डॉ. चंद्रकांत शेट्यो यांनी म्हटले.
मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्या हस्ते फीत कापून, कोनशिला अनावरण करून तसेच पंप यंत्रांची पूजा करून या प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. सूत्रसंचालन समृद्धी गणपुले यांनी केले. मुख्य अभियंता ज्ञानेश्वर सालेलकर यांनी स्वागत केले.
