Headlines

झिम्बाब्वेत भारताने मालिका जिंकली, पण मैदानाबाहेर फॅनची अजब मागणी! कोच लक्ष्मण, ईशान किशन का संकोचले?


IND vs ZIM Series : भारत-झिम्बाब्वे मालिका संपल्यानंतर एक भन्नाट प्रसंग घडला. एका चाहत्याने चक्क डोक्यावर ऑटोग्राफ मागितला! व्हीव्हीएस लक्ष्मण अन् ईशान किशनचा व्हिडिओ व्हायरल.

vvs laxman ishan kishan fan autograph video
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई : भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील तीन सामन्यांची टी२० मालिका अखेर टीम इंडियाने ३-० अशी जिंकली. २३ जुलैपासून सुरू झालेली ही मालिका २६ जुलैला संपली. मालिकेतील तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात भारताने ७ विकेट्सने विजय मिळवला. त्यानंतर दुसऱ्या सामन्यात श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने झिम्बाब्वेचा ९० धावांनी पराभव केला. तिसऱ्या सामन्यातही भारताने यजमान संघाला ३५ धावांनी हरवत मालिकेवर ३-० असा कब्जा केला. मात्र, मालिका जिंकल्यानंतर मैदानाबाहेर घडलेला एक मजेशीर प्रसंग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

VVS लक्ष्मण आणि ईशान किशनला फॅनची भन्नाट मागणी

भारताने झिम्बाब्वेचा क्लीन स्वीप केल्यानंतर कार्यवाहक मुख्य प्रशिक्षक VVS लक्ष्मण आणि विकेटकीपर फलंदाज ईशान किशनचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक फॅन दोघांकडून ऑटोग्राफ घेताना दिसत आहे. मात्र, या फॅनने ऑटोग्राफ घेण्यासाठी डायरी, कागद किंवा हात पुढे केला नाही. त्याने थेट आपल्या डोक्यावर सही करण्याची मागणी केली. फॅनची ही मागणी ऐकल्यानंतर VVS लक्ष्मणने कोणताही संकोच न करता लगेच त्याच्या डोक्यावर ऑटोग्राफ दिला.

यानंतर फॅनने ईशान किशनकडेही अशीच मागणी केली. सुरुवातीला ईशान थोडा संकोचला आणि त्याने नकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, फॅनने पुन्हा आग्रह केल्यानंतर ईशानला हसू आवरलं नाही. शेवटी त्यानेही फॅनच्या डोक्यावर ऑटोग्राफ दिला.

हा मजेशीर प्रसंग वरिष्ठ क्रीडा पत्रकार विमल कुमार यांनी आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. त्यांनी हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला असून, तो समोर आल्यानंतर चाहतेही या प्रसंगाचा चांगलाच आनंद घेत आहेत.

गौतम गंभीरच्या अनुपस्थितीत VVS लक्ष्मणकडे जबाबदारी

दरम्यान, झिम्बाब्वे दौऱ्यासाठी भारतीय संघासोबत मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि त्यांचा सपोर्ट स्टाफ गेला नव्हता. त्यामुळे सेंटर ऑफ एक्सलन्सचे प्रमुख VVS लक्ष्मण आणि त्यांच्या स्टाफकडे कार्यवाहक प्रशिक्षक म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.

VVS लक्ष्मणच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाने आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या टी२० मालिकांच्या तुलनेत झिम्बाब्वेविरुद्ध दमदार कामगिरी केली. संघातील जवळपास प्रत्येक खेळाडूने आपापल्या परीने योगदान दिलं आणि त्याचा परिणाम मालिकेच्या निकालातही दिसून आला.

श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली पहिली मालिका जिंकली

टी२० विश्वचषकानंतर भारतीय संघाने जिंकलेली ही पहिलीच टी२० मालिका ठरली आहे. यापूर्वी टीम इंडियाला आयर्लंडविरुद्ध २-० आणि इंग्लंडविरुद्ध ४-० अशा पराभवाचा सामना करावा लागला होता. त्यामुळे झिम्बाब्वेविरुद्धच्या क्लीन स्वीपमुळे भारतीय संघाचा आत्मविश्वास नक्कीच वाढला आहे.

विशेष म्हणजे, श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्यांदाच टी२० मालिका जिंकली आहे. या मालिकेत वैभव सूर्यवंशीनेही दमदार कामगिरी केली. त्याने तीन सामन्यांच्या तीन डावांमध्ये १५१ धावा केल्या. त्याच्या नावावर दोन अर्धशतकं आहेत. या कामगिरीसाठी त्याला मालिकावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं.

सुनिल लाटे

लेखकाबद्दलसुनिल लाटेसुनिल प्रभाकर लाटे हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. ते गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय आहेत. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये ते स्थानिक बातम्या, लाइव्ह ब्लॉग कव्हरेज, गुन्हेगारी, राजकारण, देश-विदेश, सरकारी योजना, तसेच इन्फ्रास्ट्रक्चर आणि नागरी विकासाशी संबंधित विषयांवर नियमित लेखन करतात. २०२२ मध्ये पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात ‘लोकसत्ता ऑनलाइन’ (मुंबई) येथून केली.सुनिल यांनी राजकारण, मनोरंजन, क्रीडा आणि गुन्हेगारी अशा विविध विषयांचे वार्तांकन व विश्लेषण प्रभावीपणे केले आहे. हायपरलोकल न्यूज, क्राईम रिपोर्टिंग, राजकारण आणि चालू घडामोडींवरील नाविन्यपूर्ण डिजिटल कंटेंट लिहिण्याचा त्यांना दांडगा अनुभव आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वृत्तपत्रविद्या विभागातून पत्रकारितेतील पदव्युत्तर शिक्षण (MA) पूर्ण केले आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘दैनिक दिव्य मराठी’ आणि ‘दैनिक पुण्य नगरी’ यांसारख्या नामांकित वृत्तपत्रांसाठी बातम्या लिहून प्रत्यक्ष कामाचा अनुभव घेतला. यादरम्यान त्यांनी प्रामुख्याने शिक्षण क्षेत्रातील बातम्यांचे कव्हरेज केले.अचूक आणि प्रभावी डिजिटल रिपोर्टिंग ही सुनिल यांची खासियत आहे. गेल्या तीन वर्षांत त्यांनी उत्कृष्ट ‘न्यूज सेन्स’ आणि ‘ब्रेकिंग न्यूज’ कव्हरेजचे संपादन कौशल्य विकसित केले आहे. महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये काम करताना वेगवान अपडेट्स देणे आणि डिजिटल वाचकांना समजेल अशा सोप्या शैलीत घडामोडींची मांडणी करणे, यात त्यांनी प्राविण्य मिळवले आहे. पत्रकारितेतील नवनवीन तंत्रे शिकून स्वतःला अधिक सक्षम बनवण्यावर त्यांचा सतत भर असतो.पत्रकारितेसोबतच त्यांना फोटोग्राफी, व्हिडिओ एडिटिंग आणि ग्राफिक्स डिझाइनची विशेष आवड असून, जाहिरात क्षेत्रातही त्यांनी काम केले आहे. सर्जनशील लेखनाची ओढ असलेल्या सुनिल यांनी काही लघुपटांचे दिग्दर्शन आणि पटकथा लेखनही केले आहे. तसेच, संगीत आणि गायन क्षेत्रातही त्यांना विशेष रुची आहे.आणखी वाचा