Headlines

Amruta Fadnavis Reaction on Devendra Fadnavis And Maharashtra Politics


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पक्षाकडून केंद्रीय मंत्रिमंडळाची संधी दिली जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. याबाबत अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Amruta Fadnavis
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस या आज पंढरपुरात दाखल झाले आहे. देवेंद्र फडणवीस सपत्नीक वारीत सहभागी झाले. मुख्यमंत्री वारकऱ्यांसह हरिनामात तल्लीन झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पत्नी अमृती फडणवीस यांच्या हस्ते पंढरपुरात आषाढी एकादशीला महापूजा केली जाणार आहे. दरम्यान, अमृता फडणवीस यांनी पंढरपुरात माध्यमांना प्रतिक्रिया दिली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आगामी काळात पक्षाकडून दिल्लीत केंद्रीय मंत्रीपदाची संधी दिली जाऊ शकते, अशी चर्चा सातत्याने राजकीय वर्तुळात होत आहे. याबाबत पत्रकारांनी अमृता फडणवीस यांना प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी आम्हाला दिल्लीला जायचे नाही तर महाराष्ट्रातच राहायचे आहे, असं अमृता फडणवीस यांनी स्पष्ट केलं. “मला महाराष्ट्रातच राहायचं आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

“विठ्ठलाच्या चरणी हेच साकडं घातलं की, प्रत्येक महाराष्ट्र आणि देशाच्या नागरिकासमोर असणारे प्रश्न सुटो. बळीराजा सुखी होवो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आपले जे नेते आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, किंवा राज्यकर्ते असतील, त्यांना एवढी सद्बुद्धी राहो की, लोकांसाठी जीवनभर त्यांनी झटावं”, असं अमृता फडणवीस म्हणाल्या.

CPJ आंदोलनावर अमृता फडणवीस यांची प्रतिक्रिया

“पेपरफुटीच्या प्रकरणावर सरकार स्तरावर काम सुरु आहे. या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात लढवला जाणार आहे. आरोपींची शिक्षा वाढवण्याबाबतचाही कायदा केला जातोय. विद्यार्थ्यांवर अन्याय नको यासाठी सरकार वेगवेगळे नवे नियम आणत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर अन्याय होणार नाही याची सरकार तसदी घेत आहे”, अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.

“प्रत्येक व्यक्तीला किंवा कलाकाराला आपले विचार मांडण्याचा अधिकार आहे. तो अधिकार ते बजावत आहेत. ही चांगली गोष्ट आहे”, अशी देखील प्रतिक्रिया त्यांनी दिली.

“लाठीचार्जवर मी सांगू इच्छिते की, पोलिसांवरही काही समाजकंटकांनी वार केला. काही मुलांवरही वार झाला. हे खूप निंदनीय आहे. तो क्षण काळा क्षण होता. हे असं पुढे पुन्हा व्हायला नको. कुणीही कुठेही गैरवर्तन केलं असेल तर त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी”, अशी भूमिका अमृता फडणवीस यांनी मांडली.

ठाकरे बंधूंवर अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

“दोन ठाकरे एकत्र येऊन काही करत आहेत. इतके दिवस ते वेगळे होते. आता एकत्र आले आहेत ही एक चांगली गोष्ट आहे. आपल्याला ती सकारात्मकतेने घेतले पाहिजे”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.