India vs Afghanistan T20 Series 2026: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात सप्टेंबरमध्ये तीन टी-२० सामने खेळवले जाणार आहेत. या मालिकेचे आयोजन कोण करणार आणि ही मालिका का खास आहे, जाणून घ्या.

भारत-अफगाणिस्तान मालिकेत इतिहास घडणार?
सर्व काही नियोजित वेळापत्रकानुसार पार पडलं तर भारत आणि अफगाणिस्तानमधील ही मालिका क्रिकेटच्या इतिहासातील एका अनोख्या घटनेची साक्षीदार ठरू शकते. कारण भारतीय भूमीवर येऊन अफगाणिस्तान क्रिकेट बोर्डाकडून भारताविरुद्धच मालिका आयोजित केली जाण्याची ही पहिलीच वेळ असेल.
अफगाणिस्तानकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी कायमस्वरूपी घरचं मैदान नाही. सुरक्षेच्या कारणांमुळे अफगाणिस्तानचा संघ गेल्या काही वर्षांपासून भारतात आपले घरचे सामने खेळत आहे. यापूर्वी ग्रेटर नोएडा, डेहराडून आणि लखनौ या ठिकाणी अफगाणिस्तानने घरच्या मैदानावर सामने खेळले आहेत. मात्र, भारतीय संघाविरुद्ध भारतातच यजमानपद भूषवण्याचा योग यापूर्वी कधीही आला नव्हता. त्यामुळे सप्टेंबरमध्ये होणारी ही मालिका ऐतिहासिक ठरण्याची शक्यता आहे.
आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी होणार मालिका
दरम्यान, भारतीय संघाच्या आगामी वेळापत्रकावर नजर टाकली तर ऑगस्टमध्ये टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारत दोन कसोटी सामने खेळणार आहे. दुसरा कसोटी सामना २७ ऑगस्टला संपणार आहे. त्यानंतर जवळपास दोन आठवड्यांनी भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध टी२० मालिकेत मैदानात उतरेल.
विशेष म्हणजे, २४ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी ही मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे आशियाई स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघासाठी या मालिकेला वेगळं महत्त्व असणार आहे.
यापूर्वी भारताने दिला होता मोठा धक्का
भारत आणि अफगाणिस्तानचे संघ यापूर्वी जून महिन्यात आमनेसामने आले होते. त्यावेळी अफगाणिस्तानने भारताचा दौरा केला होता. भारताने एकमेव कसोटी सामन्यात अफगाणिस्तानचा डाव आणि ३०० धावांनी पराभव केला होता. त्यानंतर झालेल्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतही भारतीय संघाने अफगाणिस्तानला व्हाइटवॉश दिला होता.
त्यामुळे आता टी२० मालिकेत चांगली कामगिरी करण्याच्या निर्धाराने अफगाणिस्तानचा संघ मैदानात उतरणार आहे. भारताविरुद्धच्या मागील मालिकांमधील पराभवाची भरपाई करण्याची संधीही त्यांच्यासमोर असेल.
टीम इंडियालाही लय मिळवण्याची संधी
टी२० विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय संघाची अलीकडची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झालेली नाही. भारताने आयर्लंडविरुद्धची टी२० मालिका गमावली. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यावर पाच सामन्यांच्या टी२० मालिकेत भारताला ०-४ असा पराभव स्वीकारावा लागला. या मालिकेतील एक सामना पावसामुळे रद्द झाला होता. त्यानंतर वनडे मालिकेतही भारताचा १-२ असा पराभव झाला.
मात्र, आता भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत विजयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे भारतीय संघ पुन्हा एकदा विजयाची लय पकडण्याच्या प्रयत्नात आहे. अशातच अफगाणिस्तानविरुद्धची टी२० मालिका भारतीय संघाला आशियाई क्रीडा स्पर्धांपूर्वी आत्मविश्वास मिळवण्याची आणि आपली लय पुन्हा मिळवण्याची चांगली संधी देणार आहे. त्यामुळे या मालिकेत टीम इंडियाची कामगिरी कशी राहते, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

