पंढरीची आषाढवारी म्हणजे चैतन्याचा सोहळा. राज्याच्या कानाकोपऱ्यातून माहेरओढीने आलेला वारकरी पंढरीच्या वाळवंटी आज विसावला असेल. उद्या प्रत्यक्षात पांडुरंगाचरणी लीन होण्याचे अतर्क्य समाधान त्याला लाभेल. आषाढीला येऊन विठ्ठलदर्शने धन्य होणे या आत्मिक आनंदापोटी शेकडो वर्षे पंढरीत वारकऱ्यांचा मेळा जमतो.
उदंड पाहिले उदंड ऐकिले।
उदंड वर्णिले क्षेत्र महिमे॥
ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर।
ऐसा विटेवर देव कोठे॥
आपल्या भक्तांसाठी भीमातीरी विठ्ठल ‘युगे अठ्ठावीस विटेवरी उभा’ आहे. म्हणून शतकानुशतके शेकडो मैल वारकरी पायी ज्ञानोबा-तुकोबाचा गजर करीत विठ्ठलाचे सावळे सगुण मनोहर रूप डोळ्यात साठवून घेण्यासाठी पंढरीत येतो तो ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस, पाहे रात्रीं दिवस वाट तुझी’ या आर्त ओढीने. अशावेळेस वारकऱ्यांच्या मनात भाव एकच असतो सगुण-निर्गुण, निराकार अरुपाचे रूप असा पांडुरंग पाहणे. कारण ‘तुका म्हणे काही न मागे आणिक। तुझे पायी सुख सर्व आहे॥
विठ्ठलाच्या पायावर डोके ठेवून सुखाची अनुभूती आत्मानुभवाशिवाय कळणे शक्य नाही. या अनुभूतीपोटी वारकरी वर्षानुवर्षे येत राहतो. इथे ना कुठला भेद, ना कुठले प्रघात. समतेच्या विचारांचा उगम वारीतलाच; म्हणून तर पंढरीची वारी महाराष्ट्राची लोकसंस्कृती , तर विठ्ठोबा-रुखमाई ही आमची पिढीजात वहिवाट बनून चंद्रभागेसारखीच निरंतर इथल्या चराचरातून वाहते आहे.
वेढा वेढा रे पंढरी, मोर्चे लावा भीमातीरी,
चला चला संत जन, करा देवासी भांडण,
लुटालुटा पंढरपूर, धरा रुखमाईचा वर,
तुका म्हणे चला, गाव निशाणी घातला…
जनाईच्या शिव्या, तुकोबांचा रोकडा सवाल, ‘काय भुललासी वरलिया रंगा’ ही चोखोबाची आर्त हाक ऐकूनही विठ्ठल शेकडो वर्ष मौन, स्थितप्रज्ञ आहे. तो क्षणार्धात इथल्या मातीतल्या माणसांच्या सुखदुःखांशी एकरूप होतो; तेव्हा ‘अवघा रंग एक’ होतो, मीपण तूपण वाया जाते, काम, क्रोध पळून जाऊन विदेही अवस्थेची अनुभूती येते; तेव्हा अंतरंगात ‘आनंदाचे डोही, आनंद तरंग’ हाच भाव दाटून येतो!

