कळंबा : कळंबा गावसह कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी असलेल्या ऐतिहासिक कळंबा तलावाच्या संरक्षणाचा प्रश्न महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ऐरणीवर आला. दैनिक तरुण भारतने प्रसिद्ध केलेल्या कळंबा तलावाच्या संरक्षण भिंतीवरील तडे, तलावाच्या भरावाची धोकादायक अवस्था आणि संवर्धनाच्या गरजेबाबतच्या वृत्ताची दखल घेत नगरसेविका स्नेहा तेंडुलकर यांनी सभागृहात हा विषय उपस्थित केला. रंकाळा तलावाप्रमाणेच कळंबा तलावाचेही संवर्धन, सुशोभीकरण आणि जतनामी विशेष कृती आराखडा तयार करण्याची मागणी त्यांनी केली.
सभागृहात बोलताना तेंडुलकर म्हणाल्या, कोल्हापूरकरांना शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, या दूरदृष्टीतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी दीडशे वर्षांपूर्वी कळंबा तलावाची निर्मिती केली. आजही कळंबा गावासह शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा या तलावावर अवलंबून आहे. त्यामुळे हा तलाव शहराची जीवनवाहिनी असून त्याचे संरक्षण करणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे.
त्या पुढे म्हणाल्या, कळंबा तलावाच्या संरक्षण भिंतीला अनेक ठिकाणी तडे गेले आहेत. सांडव्यालगतचा भागही धोकादायक झाला आहे. अशा स्थितीत केवळ सुशोभीकरणाचे नियोजन करून चालणार नाही. सर्वप्रथम संरक्षण भिंत, भराव आणि तलावाची सुरक्षितता सुनिश्चित करणे आवश्यक आहे.अलीकडील मुसळधार पावसानंतर संरक्षण भिंतीला पडलेल्या भरवला खच पडल्याने दैनिक तरुण भारतने छायाचित्रांसह वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर या विषयाची महापालिका सभागृहात दखल घेण्यात आली.
तेंडुलकर यांनी रंकाळा तलावाचे उदाहरण देत सांगितले की, ज्या पद्धतीने रंकाळा तलावाचे संवर्धन, सौंदर्याकरण आणि पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणात कामे होत आहेत, त्याच धर्तीवर कळंबा तलावासाठीही विकास आराखडा तयार केला पाहिजे. कळंबा गावसह शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख स्रोत असलेल्या या तलावाची संरक्षण भिंत, भराव, पाण्याची गुणवत्ता आणि परिसराचा पर्यावरणीय विकास यासाठी विशेष निधी उपलब्ध करून द्यावा. तलावाच्या संरक्षण भिंतीचे स्ट्रक्चरल ऑडिट, भू-तांत्रिक तपासणी, कायमस्वरूपी दुरुस्ती आणि तलाव परिसराचे संवर्धन करण्याची मागणीही त्यांनी सभागृहात केली. या विषयावर सभागृहातील सदस्यांनीही सकारात्मक भूमिका घेत प्रशासनाने तातडीने आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेला कळंबा तलाव हा केवळ पाणीसाठा नसून कोल्हापूरच्या पाणीपुरवठ्याची जीवनवाहिनी आहे. त्यामुळे तलावाचा भराव, संरक्षण भिंत आणि पाण्याची गुणवत्ता सुरक्षित ठेवणे ही काळाची गरज आहे. रंकाळा तलावाप्रमाणेच कळंबा तलावाचेही संवर्धन, सुशोभीकरण आणि पर्यटनाच्या दृष्टीने नियोजनबद्ध विकास झाला पाहिजे. भविष्यातील पाणी पुरवठ्याच्या दृष्टीने प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, – नेहा तेंडुलकर ( नगरसेविका )
‘तरुण भारत’च्या वृत्ताची दखल
कळंबा तलावाच्या भरावाला पडलेला खच आणि संरक्षण भिंतीच्या धोकादायक स्थितीबाबत 9 जुलै रोजी दैनिक तरुण भारतने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची महापालिकेच्या सभागृहात दखल घेण्यात आली. नगरसेविका स्नेहा तेंडुलकर यांनी हा विषय उपस्थित करत तातडीच्या उपाययोजनांची मागणी केली.
रंकाळा धर्तीवर कळंबा तलावाच्याया विकासाची मागणी –रंकाळा तलावाप्रमाणेच कळंबा तलावाचेही संवर्धन, सुशोभीकरण, भरावाचे मजबुतीकरण आणि पर्यटन विकासासाठी स्वतंत्र आराखडा तयार करून विशेष निधी उपलब्ध करावा, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.
पाणीपुरवठयाचा प्रश्न महत्त्वाचा
कळंबा गावासह शहरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा कळंबा तलावावर अवलंबून आहे. त्यामुळे भरावाची दुरुस्ती, संरक्षण भिंतीचे मजबुतीकरण आणि पाण्याची गुणवत्ता जपण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
कळंबा तलावाच्या भरावाबाबत ग्रामपंचायतीने सातत्याने पाठपुरावा केला आहे. आता सभागृहातही या प्रश्नाची दखल घेतली गेली असून प्रशासनाने विलंब न करता कायमस्वरूपी दुरुस्तीची कामे हाती घ्यावीत,”अशी प्रतिक्रीया कळंबाचे सरपंच सुमन गुरव यांनी दिली आहे.
