Headlines

महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे पहिल्यांदाच हटके भूमिकेत,’अगं आई अहो आई’ वेब सीरिजचा ट्रेलर चर्चेत


Aga Aai Aaho aai web series trailer: अभिनेत्री हृता दुर्गुळे हिच्या आगामी वेब सीरिजची सध्या चर्चा सुरू आहे. ‘अगं आई अहो आई’ असं या सीरिजचं नाव आहे. या सीरिजचा ट्रेलर नुकताच समोर आलाय.

Aga Aai Aaho Aai
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई: सासू आणि सून या विषयावर अनेक मालिका, सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. पण आता याच विषयावर आधारित पण हटके कथानक असलेली आई, सासू आणि लेकीच्या नात्याचा हळवा प्रवास दाखवणारी ‘ अगं आई अहो आई ‘ ही सीरिज चर्चेत आली आहे.

‘अगं आई अहो आई‘ या आगामी मराठी वेब सीरिजचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला. लग्नानंतर प्रत्येक मुलीच्या आयुष्यात अनेक बदल घडतात. माहेरशी असलेलं नातं जपत नव्या घराशी आणि नव्या माणसांशी जुळवून घेण्याचा तिचा प्रवास अनेक भावनिक वळणांनी भरलेला असतो. याच कौटुंबिक नात्यांतील जिव्हाळा, विश्वास आणि एकमेकांना स्वीकारण्याचं भावविश्व उलगडणारी ZEE5 ची नवी मराठी ओरिजिनल वेब-सीरिज ‘अगं आई अहो आई’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Maharashtra TimesMahesh Tilekar: ‘सुगीचे दिवस आलेत, आता तुम्ही चांदीच्या ताटात जेवायचं’,आशा भोसलेंनी महेश टिळेकरांना दिलेली खास भेट

तगडी स्टारकास्ट
सीरिजमध्ये मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री हृता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे. तिच्यासोबतच ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेत्री रेणुका शहाणे आणि निर्मिती सावंत यांच्या अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनेते सुयोग गोऱ्हे हादेखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे.

Maharashtra TimesMedha Manjrekar: श्रीकृष्णालासुद्धा दुःख चुकलं नाही, टाटा रुग्णालयाबाहेर बसलेल्या रुग्णांना पाहिलं की माझं दुःख छोटं वाटायचं: मेधा मांजरेकर
काय आहे सीरिजची कथा?
पुण्यात लहानाची मोठी झालेल्या एका तरुणीचं लग्नानंतर कोल्हापूरमध्ये सुरू होणारं नवं आयुष्य, ही या सीरिजची मध्यवर्ती गोष्ट आहे. नवीन संस्कार, वेगळ्या परंपरा आणि पूर्णपणे अपरिचित वातावरणात स्वतःचं स्थान निर्माण करताना ती नात्यांची नव्यानं उकल कशी करते, हे यात दाखवण्यात आलं आहे.

नेहमीच्या मालिकांप्रमाणे सासू-सुनेतील वाद किंवा संघर्ष दाखवण्याऐवजी, या मालिकेत त्यांच्यातील मैत्री, समजूतदारपणा आणि भावनिक परिपक्वता अधोरेखित करण्यात आली आहे. एका स्त्रीला लग्नानंतर दोन मातृछत्रांचा (आई आणि सासू) आधार कसा लाभू शकतो, हे अतिशय संवेदनशीलतेनं मांडण्यात आलं आहे. ‘गुलाबजाम’ आणि ‘हे काय नवीन?’ फेम दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी या सीरिजचे दिग्दर्शन आणि लेखन केलं आहे.

कधी होणार रिलीज? हा कौटुंबिक नात्यांचा अनोखा उत्सव आणि रक्ताच्या नात्यांपेक्षा मनानं जोडलेल्या माणसांची ही गोष्ट २४ जुलै २०२६ रोजी झी५ (ZEE5) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.