![]()
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (एनएचएम) कार्यरत असलेल्या जिल्ह्यातील ५२५ अधिकारी-कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळणार आहे. १० वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या या कर्मचाऱ्यांची यादी नुकतीच जाहीर करण्यात आली आहे. या यादीतील संभाव्य तांत्रिक चुकांवर हरकती नोंदवण्यासाठी संबंधित उमेदवारांना ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. प्राप्त हरकती आणि सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल. त्यानंतर ७ ऑगस्ट रोजी अंतिम यादी (हार्ड आणि सॉफ्ट कॉपी) जाहीर केली जाईल. ही यादी ८ ऑगस्ट रोजी विशेष दूतामार्फत राज्य शासनाकडे पाठवली जाणार आहे. या संदर्भात मुंबईतील आरोग्य भवनातून सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत. गेल्या पाच-सहा वर्षांपासून ‘एकच नारा…कायम करा’ या घोषणेखाली एनएचएमचे अधिकारी आणि कर्मचारी आंदोलने करत होते. तीन वर्षांपूर्वी दोन महिन्यांचा संप पुकारून जिल्हा परिषदेसमोर ‘काळी दिवाळी’ साजरी केली होती. अखेर त्यांच्या या लढ्याला यश आले असून, शासनाने त्यांना कायम करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. जिल्ह्यात एनएचएम अंतर्गत सुमारे दीड हजाराहून अधिक अधिकारी-कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये ड्रेसरपासून ते डॉक्टरांपर्यंतच्या पदांचा समावेश आहे. अमरावती जिल्ह्यातील सुपर स्पेशालिटी रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा स्त्री रुग्णालय, क्षयरोग रुग्णालय तसेच जिल्हाभरातील ग्रामीण रुग्णालये आणि आरोग्यवर्धिनींमध्ये हे अधिकारी-कर्मचारी सेवा देत आहेत. एनएचएम कर्मचाऱ्यांना कायम करण्याचा निर्णय डॉ. तानाजी सावंत आरोग्यमंत्री असतानाच घेण्यात आला होता. परंतु, तो अंमलात आणण्यासाठी तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यामुळे एनएचएमच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी पुन्हा सक्रिय होत विद्यमान आरोग्यमंत्री प्रकाश आबीटकर यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचवला. त्यानुसार आता पुढील प्रक्रिया सुरू झाली आहे. याद्या तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि वेळेत पूर्ण करण्यासाठी राज्यस्तरावर परिमंडळ कार्यक्रम व्यवस्थापक आणि मूल्यमापन व संनियंत्रण अधिकाऱ्यांचे विशेष कार्यपथक तैनात करण्यात आले आहे. सेवा समायोजनाच्या कार्यवाहीत कोणताही विलंब किंवा त्रुटी राहिल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांना वैयक्तिकरीत्या जबाबदार धरले जाईल, असे सक्त निर्देश राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक व आयुक्त यांनी दिले आहेत. १० वर्षांची सेवा पूर्ण झालेल्या कर्मचाऱ्यांना आरोग्य विभागातील रिक्त जागांवर कायम करण्यासाठी शासनाने एक विशिष्ट सूत्र ठरवले आहे. यानुसार, ७० टक्के जागा सरळ सेवा भरतीने भरल्या जातील, तर उर्वरित ३० टक्के जागांवर एनएचएमचे अधिकारी-कर्मचारी घेतले जातील. नियमित आस्थापनेतील जागा जशजशा रिक्त होत जातील, त्या-त्या वेळी या सूत्रांनुसार भरती केली जाणार आहे.
Source link
525 NHM कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरी:यादी जाहीर; हरकती नोंदवण्यासाठी 31 जुलैपर्यंत मुदत, 7 ऑगस्ट रोजी अंतिम यादी
